किल्ला कोथळीगड
रायगड जिल्यातील कर्जतच्या ईशान्य बाजूला साधारण २१ कि.मी. अंतरावर कोथळीगड
आहे. कोथलीगडाच्या पायथ्यापाशी पेठ गाव असल्यामुळे त्याला पेठचा किल्ला म्हणूनही
ओळखले जाते. हा किल्ला समुद्र सपाठीपासून ४७२ मी. उंचीवर आहे. या किल्ल्याचे
विशिष्ट म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी `ह्याला गुहेतून अर्धभूयारी मार्ग
आहे. त्यामुळे इतर किल्ल्यांपेक्षा त्याचे हे वेगळेपण जाणवते. पेठ गावातून गडावर
जाण्यास वाट असून साधारण अर्धा तासात भग्र प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचतो.
भैरोबाचे देऊळ असलेल्या गुहेच्या तोंडाशी पोहोचल्यावर पुढे गडाच्या कातळातून खोदलेल्या
७५ पायऱ्यांची वाट चढून हत्ती आणि सिंह कोरलेल्या प्रवेशद्वारातून गडाचा माथ्यावर
जाता येते. पाण्याचं एक टाकं, पडक्या देवळांचे आणि वाड्याचे काही अवशेष तेथे
दिसतात. गड माथ्यावरून पदरगड, माथेरानचा भाग, भिमाशंकर डोंगरांची
रांग इ. दिसते. गड माथ्यावरून निसर्ग अतिशय सुरेख दिसतो. इतिहास काळात या गडाचा
वापर तेलणीसाठी होत असे. गडाची निर्मिती सातवाहन काळातील असावी. मराठ्यांच्या
काळात या गडाचा वापर शस्त्रांचा साठा करण्यासाठी केला जात असे. छत्रपती संभाजी
राजांच्या काळात गडाच्या किल्लेदाराने गफलतीन मोगल सरदारांना व त्याच्या सैन्याला
मराठे समजून गडावर प्रवेश दिला. मोगल सैन्याने याचा फायदा घेऊन गड काबीज केला.
औरंगजेबाला ही बातमी कळताच त्याने या विजयाच्या शिल्पकाराला गडाच्या दरवाजाची
सोन्याची किल्ली भेट दिली. असे इतिहासात सांगितले आहे. लहानसा पण कातळात खोदलेल्या
भुयारी मार्गामुळे प्रेक्षणिय असा हा किल्ला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा