सातारा शहरापासून नांदगिरी हा अत्यंत जवळचा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,०७८ मी. उंचीवर हा किल्ला वसलेला आहे. पायवाटेने गडाकडे जाताना काही पायऱ्या चढल्यावर वाटेत बौध्दकालिन एक गुहा लागते. गुहेमध्ये एका खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत जाताना समोर एक भव्य कातळ भिंत दिसते. तेथून पायऱ्यांनी खाली उतरल्यावर जलमंदिर दिसते. हे जलमंदिर नांदगिरी किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. गडावरील दुसऱ्या प्रवेशद्वाराने पुढे गेल्यावर हनुमानाचे मंदिर लागते. येथील हनुमानाची मूर्ती लहानसा असून येथे पाण्याचे तळे व दगडी वृंदावन आहे. गडावरून ज्र्ण्देश्व्राचा डोंगर, अजिंक्यतारा गड व यवतेश्वर इ. परिसर दिसतो. नांदगिरी किल्ला हा शिलाहार भोज राजाने बांधला. १६७३ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. १७०१ मध्ये या किल्ल्यावर स्वारी करून ओरंगजेबाने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता; परंतु मराठ्यांनी तो पुन्हा युद्ध करून जिंकला. अनेक वर्षे या किल्ल्याचा ताबा पंतप्रतिनिधींकडे होता. १८१८ मध्ये ब्रीतीशांनी या किल्ल्यावर ताबा मिळविला. नांदगिरी किल्ला हा ‘कल्याणगड’ या नावाने ओळखला जातो.
Translate
गुरुवार, ४ जानेवारी, २०१८
किल्ला सज्जनगड
किल्ला सज्जनगड
समर्थ
रामदासांचा निवास आणि समर्थांची समाधी असलेला एक ऐतिहासिक आणि पवित्र गड म्हणजे
सज्जनगड. समुद्र सपाटीपासून ९८१ मी उंचीवर असलेला हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून
अजिंक्यतारा किल्ल्याच्या जवळ हा किल्ला आहे. गडावर जाताना सुरवातीला छत्रपती
शिवाजी प्रवेशद्वार लागेत. नंतर दुसरा महादरवाजा लागतो. प्रवेशद्वाराच्या बाजूला
वीर हनुमान आणि वराहमुर्ती आहे. गडावर समर्थांना सापडलेल्या आंग्लाई देवीच्या
मूर्तीचे मंदिर आहे. तसेच एक मोठा तलाव असून त्याला घोडाळे तलाव असे नाव आहे.
श्रीधर कुठी, सोनाळे तळे व मुख्य म्हणजे राम मंदिर याचे दर्शन घडते. मंदिरात राम,
लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. तलघरामध्ये समर्थांची
समाधी आहे. समाधीवर सुंदर मेघडंबरी असून समर्थांच्या पादुकांचेही दर्शन गडावर
घडते. मंदिराच्या जवळच समर्थांचा मठ तसेच समर्थ वापरीत असलेले सामानही आपल्याला
बघायला मिळते. त्यात प्रामुख्याने पलंग, पिकदाणी, पानाचा दबा, पाण्याचा लोटा व
तलवार लपविलेली कुबडी इ. वस्तू आहेत. गडावरील तटाच्या रक्षणासाठी समर्थांनी स्थापन
केलेल्या मारुतीचेही दर्शन घडते. साज्ज्न्गादाचे पूर्वीचे नाव ‘आश्वलायन गड’ असे
होते. तसेच परळीचा किल्ला म्हणूनही हा किल्ला ओळखला जात असे. १६६२ मध्ये
आफ्जाखानाचा मुलगा फाजलखान हा गडाचा किल्लेदार होता. एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी
महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर समर्थ या किल्ल्यावर वास्तव्यास आले व संत
सज्जनांच्या वास्त्व्याने पुनीत झाल्यामुळे या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे पडले.
किल्ला राजगड
किल्ला राजगड
राजगड हा महत्वाचा डोंगरी
किल्ला असून शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची सुरवातीची राजधानी राजगड या
किल्ल्यावर होती. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वेल्हे गावापासून आग्नेयेला
साधारण १६ कि. मी. अतंरावर हा किल्ला आहे. राजगडाची समुद्र सपाटीपासून उंची १,३७६
मी. आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे या गावापासून पायवाटेने गडावर
जाता येते. या गावापासून राजगडाचा चढ सुरु होतो. ही वाट हत्ती, घोडे किंवा वाहन
जातील इतकी रुंद आहे. गडाच्या उत्तरेला पद्मावती, आग्रेयेला सुवेळा आणि नैऋत्येला
संजीवनी अशा तीन चिलखती म्हटले जाते. किल्ल्यावर येण्यासाठी गुंजपा, पाली, आळू आणि
काळेश्वरी असे चार दरवाजे आणि तीन दिंड्या आहेत. पद्मावती हि माची बरीच मोठी
असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती या माचीवर होती. तसेच सुवेळा, संजीवनी आणि
बालेकिल्ला यावरही वस्ती होती. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबासह
बालेकिल्ल्यावर राहत असत. या गडावरची मुख्य देवता पद्मावती ही आहे. तिचे मंदिर
पद्मावती माचेवर आहे. या तेनही माच्या आणि बालेकिल्ल्यावर गणेश, मारुती,
ब्रहार्षी, काळेश्वरी आणि भागीरथी याची लहान मोठी मंदिरे आहेत. याशिवाय दारूखाना, दिवाणघार, राजवाडा आणि पागा या
वास्तूही तेथे आहेत. प्रत्येक माचीवर पाण्याची व्यवस्था आहे. शिवाजी महाराजांनी
अनेक गड ताब्यात घेताना त्यात मुरमदेव हा गड ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव
दिले. तिथे आपली राजधानी वसविली. शिवाजी महाराजांची राजधानीच असल्यामुळे या
किल्ल्यावर अनेक खलबतं होऊन अनेक ल्धायांचे निर्णय आणि विजयोत्सव साजरे केले गेले.
अशा तऱ्हेने राजगड हा महत्वाचा इतिहासाचा साक्षीदार आहे.
किल्ला वैराटगड
किल्ला वैराटगड
वाई – सातारा मार्गावरील
पाचवड गावाजवळ वैराटगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,२०० मीटर
उंचीवर असलेला हा गड सह्याद्रीच्या उपरांगेवर आहे. या गडाचे वैशिष्ट म्हणजे सुमारे
९ मीटर उंचीची कातळाची नैसर्गिक तटबंधी या किल्ल्याला लाभली आहे. तसेच या गडाचे
आकारमानही प्रशस्त आहे. गडावर पाण्याची टाकी असून हनुमानाचे एक मंदिर आहे. तसेच वैराटेश्वर
महादेवाचे मंदिरही असून मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व नंदी आहे. मंदिराजवळ एक मठ
आहे. गडाच्या पश्चिमेकडे टोकावर तटबंदीने सुरक्षित केलेली माची आहे. गडावर
तत्कालीन घरांच्या खुणा आणि पाण्याच्या कोरड्या टाक्या दिसतात. वैराटगडाच्या
माथ्यावरून मांढरदेवीचा डोंगर, कमळगड, रायेश्वर व पांडवगड इत्यादींचे दर्शन होते. वैराटगड
हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज याने निर्माण केला. इ. स.
११७८ ते ११९३ या काळात राजा भोजने अनेक गड बांधले. त्यापैकी हा एक गड आहे. कोणे
एकेकाळी या परिसरात विराट नावाची जमात राहत होती. त्यांच्या वस्तीमुळे या गडाला वैराटगड
हे नाव पडले असे मानले जाते.
किल्ला हडसर
किल्ला हडसर
पुणे जिल्यातील जुन्नर जवळ
हडसर पर्वतयेथे हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,०२८ मी. उंचीवर हा किल्ला असून
या किल्ल्याला नैसर्गिक कड्याची उभी तटबंदी आहे. जुन्नरहून जवळच हडसर हे
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या
पायऱ्या आहेत. गडाचा दरवाजा सुध्दा एक अखंड कातळ खोदून केलेला दिसतो. दुसरा
दरवाजाही कातळातच खोदलेला असून हे दोन्ही दरवाजे म्हणजे त्यावेळच्या वास्तुशास्त्राचा
एक उत्तम नमुना आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. बोगद्यासारख्या
खोदलेल्या मार्गाने पुढे गेल्यावर धान्य कोठार लागते. किल्ल्यावरील तीन प्रसस्थ गुहारी वैशिष्टपूर्ण आहेत.
गडावर शंभू महादेवाचे मंदिर असून मंदिरातील गणपती व गरुड मूर्ती अत्यंत सुंदर आहे.
मजबूत आणि उत्तम बांधकामाचा प्रकार पाहता सातवाहनांनी तो बांधला असावा असे वाटते.
१६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांच्या ताब्यात देलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला
होय. नाणे घाट मार्गावरून येणाऱ्या शत्रूला थोपविण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग
होता. कातळ भिंतीमुळे वैशिष्टपूर्ण ठरलेला हडसर तथा पर्वतगड हा किल्ला इतिहास
काळातील आपले वेगळेपण जपून होता.
किल्ला जीवधन
किल्ला जीवधन
जुन्नर जवळ असलेल्या स्वराज्याच्या निर्मीतीतील एक म्हणजे जीवधन किल्ला.
नाणेघाटाच्या मोक्यावर असलेल्या या गडाची समुद्र सपाटीपासून ११४५ मी. उंची आहे.
जुन्नरपासून जवळ असलेल्या घाटघर गावातून किल्ल्यावर जाता येते. जीवधन किल्ल्याकडे
जाणारी वाट हि अवघड आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गजांतलकलक्ष्मीचे शिल्प आहे.
पाण्याच्या दोन टाक्या व उत्तम बांधलेली धान्यकोठी दिसते. पुढे गेल्यावर जीवाबाईची
मूर्ती आणि वृंदावनाचे दर्शन होते. गडावरून हडसर, कळसुबाई, रतनगड व हरिश्चंद्रगड
दिसतात. जीवधन किल्ल्याचे वैशिष्ठ म्हणजे वांदरर्लिंगी किवा खडापारशी हे सुळके होत.
या सुळक्याच्या व गडाच्या
मध्ये खोल दरी आहे. शहाजी राज्यांच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने जीवधन हा
महत्वाचा किल्ला आहे.निजामशाहीच्या विरोधी राजकारण याच गडावर घडले. निजामशाहीचा
अस्त झाल्यावर निजामशाहीचा वंशज मुर्तीजा यांस याच गडावर कैद केले होते. शहाजी
राजांनी मुर्तीजाला सोडवून निजामाच्या गादीवर बसवले. हा सर्व इतिहास याच गडाच्या
साक्षीने झाला. इंग्रजांनी १८१९ मध्ये मराठ्यांचा पराभव करून हा किल्ला ताब्यात
घेतला. या युद्धाच्या वेळी केलेल्या तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचे अतोनात नुकसान
झाले. त्याच्या खुणा आजही दिसतात.
किल्ला घोडबंदर
किल्ला घोडबंदर
ठाणे जिल्यातील उल्हास
नदीच्या खाडीजवळ घोड्बंदरचा किल्ला आहे. उल्हास नदीच्या तीरावरील डोंगर रांगेच्या
खाडीपर्यंत पसरलेल्या सोंडेच्या शेवटी हा किल्ला बांधण्यात आला आहे. येणाऱ्या
जाण्याऱ्या गलबतांवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला.
घोडबंदरच्या वस्तीकडून किल्ल्याकडे जाताना अगोदर गव्हर्नरचा बंगला लागतो. तेथून
पुढे सुमारे ९० पायऱ्या चढून गडावर जाता येते. गडावरील अनेक कमानी अत्यंत आकर्षक
आहेत. गडावर एक दरबाराचे सभागृह आहे. गडावर बांधलेले बुरुज हे गडाचे वैशिष्ठ आहे.
गडावरून उल्हास नदीचे पात्र फार नयनरम्य दिसते.
पोर्तुगीजांच्या ताब्यातील घोडबंदर किल्ला जिंकण्यासाठी छत्रपतींनी प्रयत्न
केला होता व अखेर १७३७ मध्ये मराठ्यांचा झेंडा या किल्ल्यावर फडकला. हा किल्ला परत
घेण्यासाठी पोर्तुगीजांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. पुढे १८१७
मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला. घोडबंदर हा छोटासा किल्ला
असला तरी त्याची डागडुजी करून त्याला पुन्हा पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून
देण्याचे प्रयत्न पुरातत्व खात्याकडून केले जात आहेत.
किल्ला रामशेज
किल्ला रामशेज
नाशिक जिल्यातील आशेवाडी
गावाजवळ रामशेज नावाचा प्रसिध्द किल्ला
आहे. समुद्र सपाटीपासून ९८५ मीटरवर हा किल्ला वसवलेला असून प्रभू रामचंद्र जेव्हा
वनवासात होते तेव्हा या किल्ल्यावार त्यांचे काहीकाळ वास्तव्य होते. म्हणून रामाजी
शेज म्हणजे शैया या अर्थाने या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले.
किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराजवळ रामाचे मंदिर आहे. तेथून पुढे पायऱ्याने गडावर जाता येते.
किल्ल्याचे प्रवेशद्वार भग्रावस्थेत आहे. गडाच्या माचीवर गेल्यावर तेथे पाण्याची
टाकी तसेच गडावर धान्याची कोठारे, भगवती मातेचे मंदिर व दीपमाळ असून पडकी घरे व
तटबंदीचे अवशेष दिसतात. छत्रपती संभाजी राजांच्या कारकिर्दीत मोगलांनी हल्ला करून
गडाला वेढा आणि गडावर मात्र फार थोडे सैन्य, असे असतानाही मराठ्यांच्या वीर
सैनिकांनी गडावरून दगडांचा मारा करून मोगलांचा तोफांना तोंड दिले. जवळ जवळ साडेपाच
वर्ष हि रोमहर्षक झुंज सुरु होती. गडावर पुरेसे सैन्य आणि साधने नसताना मराठे
सैनिक चेटूक करीत नाहीत ना ? अशी शंका मोगलांना आली होती आणि अखेर १६८७ मध्ये
मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
किल्ला प्रतापगड
किल्ला प्रतापगड
प्रतापगड हा महाराष्ट्रातील
एक प्रशिद्ध असा डोंगरी किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात
महाबळेश्वरच्या नैऋत्य दिशेला १३ कि.मी.
अंतरावर हा किल्ला आहे. प्रतापगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची १,०८१ मी. आहे.
गडाच्या दोन्ही बाजूनी जवळ जवळ २५० मी. खोल असलेली दरी आहे. हा किल्ला शिवाजी
महाराजांनी बांधलेला असून जावळी जिंकल्यानंतर १६५६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांना हा
किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. या किल्ल्याचे बांधकाम दोन भागात विभागले असून
मुख्य्कील्ला आणि बालेकिल्ला अशा या इमारती आहेत. दोन्ही भागात पाण्यासाठी तलाव
असून किल्याच्या चारही बाजूला संरक्षणसाठी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहे. बुरुजांची
उंची १० ते १५ मी. आहे. या बुरुजांची अफजल, रेडका, राज पहारा आणि केदार इ.
बुरुजांचे अवशेष आजही दिसतात.
खालच्या मुख्य किल्ल्यात
१६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते स्थापना केलेले
तुल्जाभ्वानीचे मंदिर आहे. त्यासमोर दोन उंच दीपमाळा, नगारखाना इ. वास्तू आहेत.
भवानी देवीचे मुळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्यात होते. नंतर त्याचा जीर्णोध्दार
करण्यात आला. अफजलखान- शिवाजी महाराज यांची भेट आणि तेथे झालेला अफजलखानाचा वध हे
प्रतापगडाचे ऐतहासिक महत्व आहे. छत्रपती राजाराम जिंजीस जात असताना काही काळ ते
प्रतापगडावर वास्तव्यास होते. सखाराम बापू काही काळ येथे नजर कैदेत होते. नाना
फडणीसांनी काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.१९५७ मध्ये ५ मी. उंचीचा
शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा येथे उभारण्यात आला. त्याचे अनावरण पंडीत जवाहरलाल
नेहरू यांनी केले होते. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफजाखानाची कबर आहे. इ.
अनेक गोष्टीमुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला आहे.
किल्ला धोडप
किल्ला धोडप
नाशिक जिल्यातील कळवण जवळ
धोडप हा किल्ला समुद्र सपाटीपासून १४५१ मी. उंचीवर आहे.अजिंठा रांगेतील हा सर्वात
उंच किल्ला आहे. नाशिकहून कळवणकडे जाताना वडाला फाट्यावरून धोडप किल्ल्यावर जाता
येते. धोडप किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाने आत गेल्यावर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर
लागते. जवळच पाण्याच्या दोन टाक्या आहेत. पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्याने
गेल्यावर गडाच्या बांधलेल्या दरवाजा लागतो. गडावरील पडका असला तरी भव्य वाडा
ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडवितो. खडकात खोदलेल्या चार गुहा येथे आहे. गुहेत दालनं
असून चांगल्या पाण्याच्या टाक्याही आहेत. जवळच भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिरातील
मूर्ती तांदला प्रकारची आहे. गुहेपासून पुढे चिंचोळी माची लागते. गडावरील बुरुज
सुरेख आहे. येथून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. माचीच्या उजव्या बाजूला
अप्रतिम महादरवाजा असून तेथील घुमट दर्शकांना आकर्षित करतो. धोडपचा किल्ला हा १६००
पूर्वी निजामाकडे होता. १६३५ मध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकला. १६७२ मध्ये छत्रपती
शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळविण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी तो जिंकता
आला नाही; परंतु नंतर मराठ्यांना तो जिंकण्यात यश आले. पेशवाईच्या काळात
राघोबादादा व पेशवे यांच्यात लढाई होऊन राघोबादादा त्यात शरण आले. पुढे १८१८ मध्ये
हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
किल्ला वर्धनगड
सातारा जील्याच्या
खटाव तालुक्यातील वर्धनगड हा प्रसिद्ध किल्ला आहे. वर्धनगडाची समुद्र सपाटीपासूनची
उंची १,०६५ मी. आहे. अखंड तटबंदी असलेल्या हा किल्ला आकर्षण आहे. गडावर चढून
जाताना वाटेत भैरोबाचे मंदिर दिसते. तेथून पुढे मुख्य दरवाजा लागतो. पुढे एका
लहानशा टेकडीवर वर्धनी मातेचे मंदिर आहे. गडाच्या जवळच्या परिसरातील ग्रामस्थांचे
वर्धनीमाता हे प्रमुख दैवत आहे. मंदिरापुढे मोठा चौथरा व सभामंडप आहे. वर्धनी
मातेची मूर्ती ही ढाल, तलवार या शस्त्रांनी सिद्ध अशी आहे. तसेच महादेवाचे मंदिरही
दिसते. वर्धन गडावरून महिमानगड, कल्याणगड, उत्तरेला संतोषगड असा परिसर लक्ष वेधतो.
१६६१ च्या दरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज हे गडावर आले होते व काहीकाळ
त्यांनी येथे. मुक्कामही केला. १६७३ च्या सुमारास या गडाची पुर्नबांधणी करण्यात
आली. १७०० मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘सादिकगड’ असे ठेवले;
परंतु मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. नंतर १८१८ मध्ये हा
किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
किल्ला दौलताबाद
किल्ला दौलताबाद
दौलताबाद हा किल्ला
औरंगाबाद जिल्यातील एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. औरंगाबाद शहराच्या ईशान्येस
१४ कि.मी. अंतरावर वेरुळच्या रस्त्यावर एका शंकाकार डोंगरावर हा किल्ला आहे. ४.५०
कि.मी. परीघ असलेला तटबंदीचा हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची २२१ मी असून
याच्या प्राचीन इतिहासाबद्दल निश्चित माहिती नाही; परंतु असे म्हटले जाते की पाचवा
भिल्लम यादव याने ११८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून तेथे यादवांची राजधानी
केली. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिल्जी याने हा किल्ला घेतला. पुढे खंडणी देऊन
रामचंद्र यादव यास तो परत केला. मात्र मलिक काफुरने तीन वेळा हल्ले करून हरपाल
यादव यास फाशी देऊन हा किल्ला ताब्यात मिळविला. किल्ल्यावर असलेल्या विपुल
संपत्तीमुळे महंमद तुघलकाने त्याचे नाव दौलताबाद ठेवले. त्यानंतर बहामनी सत्ता,
अहमद निजामशाहा, नंतर शाहाजाहान पुन्हा निजाम अशाप्रकारे हा किल्ला वर्षोनवर्षे
वेगवेगळ्या सत्ताधिशांच्या हातात होता.
वास्तुशास्त्रदृष्ट्या
हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून बाजूनी खंदक आणि साकव आहेत. किल्ल्यावर पिण्याच्या
पाण्याची सोय आहे. अनेक गुप्तमार्ग, दरवाजे आणि शेकडो खोल्या आहेत. सर्वात उंच
असलेल्या भागास महाकोट म्हणतात. शंक्काकार बुरुज, चांदमिनार, नगारखाना, चीनिमहाल,
मशिदी आणि मंदिरेही या किल्ल्यावर आहेत. ह्या किल्ल्याचे बांधकाम अजूनही
पाहण्यासारखे असून प्रवाशांसाठी ते एक पर्यटन केंद्र झाले आहे.
किल्ला डहाणू
किल्ला डहाणू
ठाणे जिल्यातील
डहाणू गावातील हा किल्ला प्राचीन किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. डहाणू हे निसर्गरम्य
असे प्रसिद्ध बंदर आहे. डहाणू खाडीच्या मुखाजवळ हा किल्ला असून या किल्याला १५
मिटर उंचीची तटबंदी आहे. गडावर प्रवेश केल्यावर ध्वजस्तंभ असलेला बुरुज लक्ष वेधून
घेतो. या बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. हा किल्ला खूप जुना असून सध्या
येथे सरकारी कचेरी असल्यामुळे किल्याची एकूण अवस्था फारशी चांगली नाही. १५३३ मध्ये
पोर्तुगीजांनी डहाणू बंदर ताब्यात घेतले तेव्हा येथे कोट बांधला. १५८२ मध्ये
मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेताना प्रयत्न केला होता. पोर्तुगीज कॅप्टन
नोसासेन्होरा याने हा किल्ला नव्याने बांधून मनोरे, तटबंदी व भक्कम बुरुज केले.
पेशवेकाळात मराठ्यांनी स्वारी करून राणोजी शिंदे याने १७३९ मध्ये डहाणू जिंकले.
काहीकाळ डहाणूवर इंग्रजांचा ताबा होता व पुन्हा त्याचा ताबा मराठ्यांकडे आला आणि
१८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या तहामुळे डहाणू किल्ला पुन्हा ब्रिटिशांच्या
ताब्यात गेला. १८८८ पासून सरकारी कचेरी येथे सुरु झाली व ती स्वातंत्र्यानंतर आजही
आहे.
किल्ला गोरखगड
किल्ला गोरखगड
ठाणे जिल्यातील
मुरबाड जवळ गोरखगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून ६५१ मी. उंचीवर आहे. मुंबई-पुणे
मार्गावरील कर्जत वरून गोरखगडला जाता येते.किल्ल्याच्या अलीकडे रस्त्यावर
गोरखनाथांच मंदिर आहे. या देवळापासून पायवाटेने गडावर जाता येते. गोरख गडाचा सुळका
दिसतो. तेव्हा या गडावर जाण्याची वाट अवघड असल्याने लक्षात येते. कातळ मार्गाने
जाताना कातळाचाच कोरलेला दरवाजा व भुयारी मार्ग लागतो. तेथून पुढे गडाचा मुख्य सुळक्याच्या
बाजूने पायावाटेने गेल्यावर एक गुहा दिसते. गुहेच्या समोर कातळावर शिल्प कोरलेले
आहे. घोडयावर स्वार असलेल्या दोन व्यक्ती शिल्पात दिसतात.
या शिल्पात मामा
भाच्याचे शिल्प असे म्हणतात. उजवीकडे पायवाटेने दुसरी गुहा लागते. या गुहेच्या
दर्शनी भागात कोरलेले सहा खांब लक्ष वेधतात. गुहेसमोर अरुंद जागा व खोल दरी
असल्यामुळे तेथे जाताना काळजी घ्यावी लागते. गोरखगडाच्या सर्वोच्च शिखर हे कठीण पायऱ्यांमुळे गाठणे
अवघड आहे. गोरखगडच्या माथ्यावर गोरखनाथाचे लहान देऊळ आहे. गोरखगडाच्या सर्वात
वरच्या टोकावरून सह्याद्री कडे कपाऱ्यांचे विलोभनीय दर्शन घडते. समोर
मच्छिंद्रगडाच्या सुळका, दक्षिणेस सिद्धगड, उत्तरेस कळसुबाई तसेस आजोबा पर्वत, नाणेघाट
असा मोठा परिसर येथून दिसतो.
किल्ला केंजळगड
किल्ला केंजळगड
पुणे जिल्यातील भोर
पासून अत्यंत जवळ असलेल्या केंजळगड हा छोटासा किल्ला आहे. समुद्र सापठीपासून १,३००
मी. उंचीवर असलेला हा किल्ला वाई आणि रायरेश्वरच्या मधील डोंगरांच्या गिरी
शिखरांवर आहे. भोरपासून जवळ असलेल्या कोल्रे गावात गेल्यावर तेथून केंजळमाची हा
केंजलगडाचा पायथा लागतो. केंजलगडच्या चारही बाजूनी कातळ कडा आहे. अरुंद अशा उभ्या
कातळात ५४ पायऱ्या खोदून काढलेल्या आहेत. कातळातील या पायऱ्या हेच या गडाचे
वैशिष्ट आहे. डोंगरावर एक पाण्याचं तळं व केंजळाई मातेचे मंदिर आहे. गडावर जे
दारुकोठार दिसते. ते दगडात बांधलेले आहे. गडावरून पाचगणी, महाबळेश्वर पठार,
रायेश्वराचे पठार व धोम धरणाचा रम्य परिसर दिसतो. इ.स. १६१२ व्या शतकात
पन्हाळ्याच्या भोज राजाने हा किल्ला बांधला अशी नोंद आढळते. अनेक वर्षे हा किल्ला
ओस पडलेला होता. सन १६५९ मध्ये छत्रपतींनी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून पुन्हा
किल्ला वसवला. १६६६ मध्ये आदिलशहाकडे याचा ताबा होता. १६७४ मध्ये मराठ्यांनी तो
पुन्हा जिंकला. नंतर १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा किल्ला छोटासा
असला तरीही त्याच्या नैसर्गिक रचनेमुळे तो सहजपणे कोणाला जिंकणे अशक्य होते. केंजलगडच्या
जवळच रायरेश्वराचे देवस्थान असून या मंदिरातील शिवलिंगाच्या साथीनेच छत्रपतींनी स्वराज्यासाठी
शपथ घेतली होती. म्हणून हा सर्व परिसर ऐतहासिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला
जातो.
किल्ला सुधागड
किल्ला सुधागड
रायगड जिल्यातील भोर
संस्थानातील रायगड हा किल्ला समुद्र सापाठीपासून ३१९ मी. उंचीवर आहे. शिवशाहीतील
अत्यंत देखणा आणि बलदंड किल्ला म्हणून या किल्ल्याचा लौकिक आहे. भोरच्या पंत
सचिवांची कुलदेवता भोराईदेवी हि या किल्ल्यावर असल्याने अनेक वर्ष येथे उत्तम व्यवस्था
होती. अष्टविनायकांपैकी पाली गावापासून सुधागडला जाता येते. किल्याचे प्रवेशद्वार
हे दोन भक्कम बुरुजांमध्ये असून रायगडाच्या महाद्वारासारखेचं भव्य आणि सुबक आहे.
गडावरील भोराई देवीच्या मंदिराचे बांधकाम पंत सचिवाने १७५० मध्ये केले. या देवीची
स्थापना साक्षात भृगु ऋषींनी केली म्हणून भृगु आंबा व भोरांबा या नावाने पण ती
ओळखली जाते. मंदिरा शेजारी नक्षीकाम केलेल्या अनेक समाधी आहेत. पुढे एक शिवमंदिरही
आहे. गडावर झाडांमध्ये लपलेला सरकार वाडा आहे. वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे.
सुधागाद्चे क्षेत्रफळ सुमारे ५० एकराचे असून गडावर टकमक टोक आहे. इ.स. पू. २ शतकांपूर्वी
सुधागडची रचना झाली असे म्हणतात. १४३६ मध्ये बहमनी सुलतानाने गडाचा ताबा घेतला
होता. १६५७ मध्ये हा किल्ला शिवाराज्यांत दाखल झाला व तेव्हा या गडाचे सुधागड असे
नामकरण करण्यात आले.
किल्ला कोथळीगड
किल्ला कोथळीगड
रायगड जिल्यातील कर्जतच्या ईशान्य बाजूला साधारण २१ कि.मी. अंतरावर कोथळीगड
आहे. कोथलीगडाच्या पायथ्यापाशी पेठ गाव असल्यामुळे त्याला पेठचा किल्ला म्हणूनही
ओळखले जाते. हा किल्ला समुद्र सपाठीपासून ४७२ मी. उंचीवर आहे. या किल्ल्याचे
विशिष्ट म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी `ह्याला गुहेतून अर्धभूयारी मार्ग
आहे. त्यामुळे इतर किल्ल्यांपेक्षा त्याचे हे वेगळेपण जाणवते. पेठ गावातून गडावर
जाण्यास वाट असून साधारण अर्धा तासात भग्र प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचतो.
भैरोबाचे देऊळ असलेल्या गुहेच्या तोंडाशी पोहोचल्यावर पुढे गडाच्या कातळातून खोदलेल्या
७५ पायऱ्यांची वाट चढून हत्ती आणि सिंह कोरलेल्या प्रवेशद्वारातून गडाचा माथ्यावर
जाता येते. पाण्याचं एक टाकं, पडक्या देवळांचे आणि वाड्याचे काही अवशेष तेथे
दिसतात. गड माथ्यावरून पदरगड, माथेरानचा भाग, भिमाशंकर डोंगरांची
रांग इ. दिसते. गड माथ्यावरून निसर्ग अतिशय सुरेख दिसतो. इतिहास काळात या गडाचा
वापर तेलणीसाठी होत असे. गडाची निर्मिती सातवाहन काळातील असावी. मराठ्यांच्या
काळात या गडाचा वापर शस्त्रांचा साठा करण्यासाठी केला जात असे. छत्रपती संभाजी
राजांच्या काळात गडाच्या किल्लेदाराने गफलतीन मोगल सरदारांना व त्याच्या सैन्याला
मराठे समजून गडावर प्रवेश दिला. मोगल सैन्याने याचा फायदा घेऊन गड काबीज केला.
औरंगजेबाला ही बातमी कळताच त्याने या विजयाच्या शिल्पकाराला गडाच्या दरवाजाची
सोन्याची किल्ली भेट दिली. असे इतिहासात सांगितले आहे. लहानसा पण कातळात खोदलेल्या
भुयारी मार्गामुळे प्रेक्षणिय असा हा किल्ला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
















