Translate

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

किल्ला रामशेज

किल्ला रामशेज

नाशिक जिल्यातील आशेवाडी गावाजवळ रामशेज नावाचा प्रसिध्द  किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून ९८५ मीटरवर हा किल्ला वसवलेला असून प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा या किल्ल्यावार त्यांचे काहीकाळ वास्तव्य होते. म्हणून रामाजी शेज म्हणजे शैया या अर्थाने या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ रामाचे मंदिर आहे. तेथून पुढे पायऱ्याने गडावर जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार भग्रावस्थेत आहे. गडाच्या माचीवर गेल्यावर तेथे पाण्याची टाकी तसेच गडावर धान्याची कोठारे, भगवती मातेचे मंदिर व दीपमाळ असून पडकी घरे व तटबंदीचे अवशेष दिसतात. छत्रपती संभाजी राजांच्या कारकिर्दीत मोगलांनी हल्ला करून गडाला वेढा आणि गडावर मात्र फार थोडे सैन्य, असे असतानाही मराठ्यांच्या वीर सैनिकांनी गडावरून दगडांचा मारा करून मोगलांचा तोफांना तोंड दिले. जवळ जवळ साडेपाच वर्ष हि रोमहर्षक झुंज सुरु होती. गडावर पुरेसे सैन्य आणि साधने नसताना मराठे सैनिक चेटूक करीत नाहीत ना ? अशी शंका मोगलांना आली होती आणि अखेर १६८७ मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

किल्ला प्रतापगड

किल्ला प्रतापगड

प्रतापगड हा महाराष्ट्रातील एक प्रशिद्ध असा डोंगरी किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैऋत्य  दिशेला १३ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. प्रतापगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची १,०८१ मी. आहे. गडाच्या दोन्ही बाजूनी जवळ जवळ २५० मी. खोल असलेली दरी आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला असून जावळी जिंकल्यानंतर १६५६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांना हा किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. या किल्ल्याचे बांधकाम दोन भागात विभागले असून मुख्य्कील्ला आणि बालेकिल्ला अशा या इमारती आहेत. दोन्ही भागात पाण्यासाठी तलाव असून किल्याच्या चारही बाजूला संरक्षणसाठी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहे. बुरुजांची उंची १० ते १५ मी. आहे. या बुरुजांची अफजल, रेडका, राज पहारा आणि केदार इ. बुरुजांचे अवशेष आजही दिसतात.
खालच्या मुख्य किल्ल्यात १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते स्थापना केलेले तुल्जाभ्वानीचे मंदिर आहे. त्यासमोर दोन उंच दीपमाळा, नगारखाना इ. वास्तू आहेत. भवानी देवीचे मुळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्यात होते. नंतर त्याचा जीर्णोध्दार करण्यात आला. अफजलखान- शिवाजी महाराज यांची भेट आणि तेथे झालेला अफजलखानाचा वध हे प्रतापगडाचे ऐतहासिक महत्व आहे. छत्रपती राजाराम जिंजीस जात असताना काही काळ ते प्रतापगडावर वास्तव्यास होते. सखाराम बापू काही काळ येथे नजर कैदेत होते. नाना फडणीसांनी काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.१९५७ मध्ये ५ मी. उंचीचा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा येथे उभारण्यात आला. त्याचे अनावरण पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफजाखानाची कबर आहे. इ. अनेक गोष्टीमुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला आहे.

किल्ला धोडप

किल्ला धोडप

नाशिक जिल्यातील कळवण जवळ धोडप हा किल्ला समुद्र सपाटीपासून १४५१ मी. उंचीवर आहे.अजिंठा रांगेतील हा सर्वात उंच किल्ला आहे. नाशिकहून कळवणकडे जाताना वडाला फाट्यावरून धोडप किल्ल्यावर जाता येते. धोडप किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाने आत गेल्यावर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर लागते. जवळच पाण्याच्या दोन टाक्या आहेत. पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्याने गेल्यावर गडाच्या बांधलेल्या दरवाजा लागतो. गडावरील पडका असला तरी भव्य वाडा ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडवितो. खडकात खोदलेल्या चार गुहा येथे आहे. गुहेत दालनं असून चांगल्या पाण्याच्या टाक्याही आहेत. जवळच भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती तांदला प्रकारची आहे. गुहेपासून पुढे चिंचोळी माची लागते. गडावरील बुरुज सुरेख आहे. येथून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. माचीच्या उजव्या बाजूला अप्रतिम महादरवाजा असून तेथील घुमट दर्शकांना आकर्षित करतो. धोडपचा किल्ला हा १६०० पूर्वी निजामाकडे होता. १६३५ मध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकला. १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळविण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी तो जिंकता आला नाही; परंतु नंतर मराठ्यांना तो जिंकण्यात यश आले. पेशवाईच्या काळात राघोबादादा व पेशवे यांच्यात लढाई होऊन राघोबादादा त्यात शरण आले. पुढे १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. 

किल्ला वर्धनगड

किल्ला वर्धनगड

सातारा जील्याच्या खटाव तालुक्यातील वर्धनगड हा प्रसिद्ध किल्ला आहे. वर्धनगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची १,०६५ मी. आहे. अखंड तटबंदी असलेल्या हा किल्ला आकर्षण आहे. गडावर चढून जाताना वाटेत भैरोबाचे मंदिर दिसते. तेथून पुढे मुख्य दरवाजा लागतो. पुढे एका लहानशा टेकडीवर वर्धनी मातेचे मंदिर आहे. गडाच्या जवळच्या परिसरातील ग्रामस्थांचे वर्धनीमाता हे प्रमुख दैवत आहे. मंदिरापुढे मोठा चौथरा व सभामंडप आहे. वर्धनी मातेची मूर्ती ही ढाल, तलवार या शस्त्रांनी सिद्ध अशी आहे. तसेच महादेवाचे मंदिरही दिसते. वर्धन गडावरून महिमानगड, कल्याणगड, उत्तरेला संतोषगड असा परिसर लक्ष वेधतो. १६६१ च्या दरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज हे गडावर आले होते व काहीकाळ त्यांनी येथे. मुक्कामही केला. १६७३ च्या सुमारास या गडाची पुर्नबांधणी करण्यात आली. १७०० मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘सादिकगड’ असे ठेवले; परंतु मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. नंतर १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 

किल्ला दौलताबाद

किल्ला दौलताबाद

दौलताबाद हा किल्ला औरंगाबाद जिल्यातील एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. औरंगाबाद शहराच्या ईशान्येस १४ कि.मी. अंतरावर वेरुळच्या रस्त्यावर एका शंकाकार डोंगरावर हा किल्ला आहे. ४.५० कि.मी. परीघ असलेला तटबंदीचा हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची २२१ मी असून याच्या प्राचीन इतिहासाबद्दल निश्चित माहिती नाही; परंतु असे म्हटले जाते की पाचवा भिल्लम यादव याने ११८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून तेथे यादवांची राजधानी केली. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिल्जी याने हा किल्ला घेतला. पुढे खंडणी देऊन रामचंद्र यादव यास तो परत केला. मात्र मलिक काफुरने तीन वेळा हल्ले करून हरपाल यादव यास फाशी देऊन हा किल्ला ताब्यात मिळविला. किल्ल्यावर असलेल्या विपुल संपत्तीमुळे महंमद तुघलकाने त्याचे नाव दौलताबाद ठेवले. त्यानंतर बहामनी सत्ता, अहमद निजामशाहा, नंतर शाहाजाहान पुन्हा निजाम अशाप्रकारे हा किल्ला वर्षोनवर्षे वेगवेगळ्या सत्ताधिशांच्या हातात होता.

वास्तुशास्त्रदृष्ट्या हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून बाजूनी खंदक आणि साकव आहेत. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अनेक गुप्तमार्ग, दरवाजे आणि शेकडो खोल्या आहेत. सर्वात उंच असलेल्या भागास महाकोट म्हणतात. शंक्काकार बुरुज, चांदमिनार, नगारखाना, चीनिमहाल, मशिदी आणि मंदिरेही या किल्ल्यावर आहेत. ह्या किल्ल्याचे बांधकाम अजूनही पाहण्यासारखे असून प्रवाशांसाठी ते एक पर्यटन केंद्र झाले आहे.

किल्ला डहाणू

किल्ला डहाणू

ठाणे जिल्यातील डहाणू गावातील हा किल्ला प्राचीन किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. डहाणू हे निसर्गरम्य असे प्रसिद्ध बंदर आहे. डहाणू खाडीच्या मुखाजवळ हा किल्ला असून या किल्याला १५ मिटर उंचीची तटबंदी आहे. गडावर प्रवेश केल्यावर ध्वजस्तंभ असलेला बुरुज लक्ष वेधून घेतो. या बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. हा किल्ला खूप जुना असून सध्या येथे सरकारी कचेरी असल्यामुळे किल्याची एकूण अवस्था फारशी चांगली नाही. १५३३ मध्ये पोर्तुगीजांनी डहाणू बंदर ताब्यात घेतले तेव्हा येथे कोट बांधला. १५८२ मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेताना प्रयत्न केला होता. पोर्तुगीज कॅप्टन नोसासेन्होरा याने हा किल्ला नव्याने बांधून मनोरे, तटबंदी व भक्कम बुरुज केले. पेशवेकाळात मराठ्यांनी स्वारी करून राणोजी शिंदे याने १७३९ मध्ये डहाणू जिंकले. काहीकाळ डहाणूवर इंग्रजांचा ताबा होता व पुन्हा त्याचा ताबा मराठ्यांकडे आला आणि १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या तहामुळे डहाणू किल्ला पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. १८८८ पासून सरकारी कचेरी येथे सुरु झाली व ती स्वातंत्र्यानंतर आजही आहे.

किल्ला गोरखगड

किल्ला गोरखगड

ठाणे जिल्यातील मुरबाड जवळ गोरखगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून ६५१ मी. उंचीवर आहे. मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत वरून गोरखगडला जाता येते.किल्ल्याच्या अलीकडे रस्त्यावर गोरखनाथांच मंदिर आहे. या देवळापासून पायवाटेने गडावर जाता येते. गोरख गडाचा सुळका दिसतो. तेव्हा या गडावर जाण्याची वाट अवघड असल्याने लक्षात येते. कातळ मार्गाने जाताना कातळाचाच कोरलेला दरवाजा व भुयारी मार्ग लागतो. तेथून पुढे गडाचा मुख्य सुळक्याच्या बाजूने पायावाटेने गेल्यावर एक गुहा दिसते. गुहेच्या समोर कातळावर शिल्प कोरलेले आहे. घोडयावर स्वार असलेल्या दोन व्यक्ती शिल्पात दिसतात.

या शिल्पात मामा भाच्याचे शिल्प असे म्हणतात. उजवीकडे पायवाटेने दुसरी गुहा लागते. या गुहेच्या दर्शनी भागात कोरलेले सहा खांब लक्ष वेधतात. गुहेसमोर अरुंद जागा व खोल दरी असल्यामुळे तेथे जाताना काळजी घ्यावी लागते. गोरखगडाच्या   सर्वोच्च शिखर हे कठीण पायऱ्यांमुळे गाठणे अवघड आहे. गोरखगडच्या माथ्यावर गोरखनाथाचे लहान देऊळ आहे. गोरखगडाच्या सर्वात वरच्या टोकावरून सह्याद्री कडे कपाऱ्यांचे विलोभनीय दर्शन घडते. समोर मच्छिंद्रगडाच्या सुळका, दक्षिणेस सिद्धगड, उत्तरेस कळसुबाई तसेस आजोबा पर्वत, नाणेघाट असा मोठा परिसर येथून दिसतो.